दीक्षाभूमीवरील मुर्ती चा संघर्षमय इतिहास माहित आहे का ?

डॉ.बाबासाहेब आंबेडकर

कोणतीही गोष्ट मिळविण्यासाठी आंबेडकरी अनुयायांना नेहमी संघर्ष करावा लागला आहे. या संघर्षातून दीक्षाभूमीचे स्मारकही सुटले नाही. खरतर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांना या ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. संविधानाचे रचनाकार व आधुनिक भारताच्या निर्मात्या या युगनायकाच्या ऐतिहासिक परिवर्तनाची जागा स्मारकासाठी सहज उपलब्ध करणे सरकारतर्फे अपेक्षित होते. मात्र या जागेसाठीही संघर्ष करावा लागला आणि या लढ्याचे नायक होते कर्मवीर बाबू हरिदास आवळे. त्यांनी एका रात्रीत तथागत बुद्धाची प्रतिमा उभारली व पुढे कायदेशीर लढा लढला, तेव्हा कुठे आज डोळ्यात साठवावे असे स्मारक दिसते आहे.
धम्मदीक्षा सोहळा हा बोैद्ध अनुयायांच्या जीवनातील आमूलाग्र बदल करणारा क्षण ठरला आणि ही भूमी प्रेरणाभूमी ठरली. त्यामुळे या भूमीवर भव्य स्मारक निर्माण व्हावे याचे वेध त्यावेळी कार्यकर्त्यांना लागले. १९५६ साली बाबासाहेब यांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर आवळे बाबू यांच्या पुढाकाराने दीक्षाभूमीवर पहिली शोकसभा झाली आणि याच शोकसभेत स्मारक निर्मितीचा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्यासाठी प्रयत्न सुरू झाले. आवळे बाबू म्हणजे आंबेडकरी चळवळीचा झंझावातच होते. महापालिका ते राज्य शासनातील मंत्र्यापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदने, विनंती त्यांनी केली. परंतु निवेदनातून, विनंती करून काही सार्थक होणार नाही, हे त्यांना कळायला लागले. त्यांनी न्यायालयाचा लढाही लढला. पण यश मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी दर रविवारी या भूमीवर ‘बुद्ध व त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे वाचन व बुद्ध वंदना घेणे सुरू केले. हळूहळू गर्दी वाढू लागली, तसे पोलिसांचे कान टवकारले.

वाचा : बाबासाहेबांच्या लग्नासाठी वडीलांना भरावा लागला दंड

या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढली. पण काही दिवसांनी तेही कंटाळले. हीच संधी साधून आवळे बाबूंनी १९५७ साली बाबासाहेबांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला त्रिशरण-पंचशील, बुद्धवंदना, संघवंदना ग्रहण कार्यक्रम घेतला. कार्यक्रम सुरू झाला तसा मध्ये निळा पडदा लावला गेला. पडद्याच्या एका बाजूला जयंतीचा उत्सव, भाषणे सुरू होती तर दुसऱ्या बाजूला खड्डा खोदण्याचे काम सुरू होते. रात्री ९ वाजता खड्डा खोदण्याचे काम पूर्ण झाले. त्यानंतर तीन हातठेल्यांवर वाळू, विटा, सिमेंट, मुरूम आणि पाण्याचे दोन ड्रम दीक्षाभूमीवर आणून स्तंभ उभारला गेला.
धोंडबाजी मेंढे, मनोहर गजघाटे, बिसन गायकवाड आदी कार्यकर्त्यांनी कमलपुष्पात तयार केलेली बुद्धमूर्ती गोपालनगर चौकात तयार ठेवली होती. मध्यरात्री बुद्धमूर्ती दीक्षाभूमीवर आणली गेली व स्तंभावर बसवली गेली. ही बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली. सीताबर्डी पोलीस दीक्षाभूमीवर तैनात झाले. बुद्धमूर्ती बसवणाऱ्यांचा शोध सुरू झाला. त्यावेळी आवळेबाबू नावाच्या झपाटलेल्या कार्यकर्त्याने ‘मी बुद्धमूर्ती बसवली, जे करायचे ते करा’ असे छातीठोक आव्हान दिले. न्यायालयात हे प्रकरण गेले. त्यांच्यावर खटला भरला, परंतु ते मागे हटले नाहीत.
तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या सत्कारासाठी सर्वपक्षीय समिती तयार करण्यात आवळेबाबूंनी पुढाकार घेतला. जुलै १९५८ रोजी मुख्यमंत्री चव्हाण नागपुरात आले. त्यावेळी नागपूरचे डॉ. ना. भ. खरे यांच्या बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची चहापान सभा झाली. ही संधी न सोडता कम्युनिस्ट पक्षाचे भाई बर्धन, बच्छराज व्यास, डॉ. खरे, पत्रकार हरकिसन अग्रवाल, काकिरवार, आमदार पंजाबराव शंभरकर, रामरतन जानोरकर यांच्या स्वाक्षºया घेऊन दीक्षाभूमी बौद्धांना देण्यात यावी, असे संयुक्त निवेदन मुख्यमंत्री चव्हाण यांना दिले. त्यांनीही तोंडी आश्वासन दिले. आवळे बाबू २१ जुलै १९६० मध्ये विधानसभेत, ‘ऐतिहासिक अशा धम्मदीक्षेची भूमी आम्हाला मिळावी. विकत देण्यास तयार असाल तर किंमत बोला, ती मोजायला आम्ही तयार आहोत’, असे रोखठोक आवाहन देत सरकारवर गरजले. या रेट्यात भाई बर्धन यांनी विधानसभेत ‘दीक्षाभूमी बौद्धांना देण्याचे आश्वासन पाळावे’ असा मुद्दा उपस्थित केला. चव्हाण सरकारनेही पुढे जनरेट्यापुढे बौद्धांना ही भूमी देण्याचे आश्वासन पाळले. सुरुवातीला ४ एकर देण्याचे ठरले पण ही जागा अपुरी पडत असल्याने १४ एकराची मागणी लावून धरण्यात आली. भारतीय बौद्ध महासभेचे यशवंतराव आंबेडकर आणि खासदार दादासाहेब गायकवाड यांना जागेसंदर्भातील उपाययोजना करण्याची जबाबदारी दिली गेली. दीक्षाभूमीचा भूखंड मिळाला आणि त्या ऐतिहासिक भूमीवर डॉ. आंबेडकर स्मारक समितीतर्फे दादासाहेब गवई यांच्या प्रयत्नाने देखणे असे भव्य स्मारक उभे झाले.

वाचा : जेव्हा प्रवासातच बाबासाहेबांना हार्ट अटॅक येतो पण

वंचितांच्या उत्थानाचा सम्यक मार्ग दाखविणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एक देखणा पुतळा दीक्षाभूमीवर उभारण्याचे ठरले. पुतळा बाबासाहेबांचा होता, त्यामुळे दर्जाशी तडजोडीचा प्रश्नच नव्हता. या प्रज्ञावंताच्या विद्वत्तेचे तेज पुतळ्याच्या सर्वांगातून झळकणे अपेक्षित होते. मूर्तिकाराची शोधाशोध सुरू झाली आणि अखेर लष्करीबाग वस्तीतील शिल्पकार संतोष मोतीराव पराये यांचे नाव समोर आले.

पराये यांनीही कठोर साधनेने त्यांचा पुतळा साकारला. तोच पुतळा ५९ वर्षांपासून कोट्यवधी अनुयायांना सामाजिक प्रतिक्रांतीची अविरत प्रेरणा देतोय. दीक्षाभूमीवर जगभरातून अनुयायी येतात आणि याच पुतळ्यासमोर नतमस्तक होतात.

बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर कर्मवीर बाबू हरिदास आवळे यांच्या अथक परिश्रमातून १३ एप्रिल १९५७ रोजी दीक्षाभूमीवर पहिली तथागत गौतम बुद्धाची मूर्ती स्थापन झाली. याच ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा उभारला जावा, याची हुरहुरही आवळे यांना लागली होती. त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलाविली.

बाबासाहेबांचा चांगला पुतळा बनविणारा कुणी आहे का, असा प्रश्न विचारला. उपस्थितांनी वेगवेगळी नावे सुचविली. एक नाव चितार ओळीतील संतोष मोतीराव पराये यांचे आले. बाबू आवळे कार्यकर्त्यांसह पराये यांच्याकडे गेले आणि त्यांना पुतळा घडवण्याची विनंती केली. बाबासाहेबांचा पुतळा बनविण्यासाठी लष्करीबागेतील ‘हाडके भवन’ येथील जागेची निवड करण्यात आली. पुतळा बनण्यास सुरुवात झाली तेव्हा अनुयायांची गर्दी व्हायची. पुतळा जेव्हा पूर्णत्वास आला तेव्हा लोकांच्या झुंडीच्या झुंडी हाडके भवनाकडे धाव घेत होत्या. काही म्हणायचे, बाबासाहेबांचा गाल मोठा वाटतो. काही म्हणायचे, कान मोठे वाटतात. धोंडबाजी मेढे गुरुजी (कारागीर) यांनी पुतळ्याच्या गालाला सिमेंट लावले. अर्ध्या तासाने मूर्तिकार पराये आले. गालाला सिमेंट माखलेले पाहून ते फारच नाराज झाले आणि ढसाढसा रडू लागले. तेव्हा बाबू आवळे यांनी त्यांची माफी मागितली. बाबूंच्या शब्दाला मान देऊन पराये नव्या जोमाने पुतळा बनविण्यास लागले. ६ डिसेंबर १९६३ रोजी पुतळ्याच्या अनावरणाचा दिवस ठरला. दुपारी २ वाजता साडेपाच फूट उंचीच्या भव्य व आकर्षक अर्धपुतळ्याची विशाल मिरवणूक कर्मवीर दादासाहेब गायकवाड व रावबहादूर एन. शिवराज यांच्या उपस्थितीत बाबू आवळे यांच्या नेतृत्वात निघाली. सायंकाळी मेणबत्तीच्या प्रकाशात दीक्षाभूमीवर मिरवणूक पोहोचली. पुतळ्याला अभिवादन करण्याकरिता लाखो अनुयायी आले होते.

वाचा : आणि तो भारतातला पहिलाच बौद्ध पद्धतीचा विवाह ठरला !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *