बोधिसत्त्व म्हणजे काय व कोनाला म्हणावे ?

बौद्धमय भारत
तथागत गौतम बुद्ध हे बोधिसत्व कसे झाले व त्याना ते पद कसे प्राप्त झाले या बाबत डॉ बाबासाहेब आंबेडकर जी  बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकात लिहीतात,  ज्ञानप्राप्तीपूर्वी गौतम केवळ ‘बोधिसत्त्व’ होते. ज्ञानप्राप्तीनंतर ते ‘बुद्ध’ झाले. बोधिसत्त्व कोणाला म्हणावे? आणि बोधिसत्त्व म्हणजे काय?  बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्त्व. बोधिसत्त्व बुद्ध कसा होतो? बोधिसत्त्व हा क्रमाने जीवनाची दहा स्थित्यंतरे बोधिसत्त्व राहिला पाहिजे.

‘बुद्ध होण्यासाठी बोधिसत्त्वाने काय केले पाहिजे?’ बोधिसत्त्व आपल्या जीवनाच्या पहिल्या अवस्थेत मुदिता (joy, आनंद) प्राप्त करुन घेतो. सोनार ज्याप्रमाणे चांदीतले कीट काढून टाकतो, त्याप्रमाणे बोधिसत्त्व आपल्यातील अशुद्धता काढून टाकल्यावर असा विचार करु लागतो की, प्रथम अविचारी असलेला, पण पुढे विचारी बनलेला मनुष्य ढगातून बाहेर पडलेल्या चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो. हे जाणल्यावर त्याला आनंद होतो आणि त्याला सर्व प्राणिमात्राच्या कल्याणाची तीव्र तळमळ लागते. जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेत त्याला विमलता (purity, शुद्धता) प्राप्त होते. यावेळी बोधिसत्त्वाने कामवासनेचे सर्व विचार मनातून काढून टाकलेले असतात. तो दयाशील होतो. तो सर्वांना दया दाखवतो. तो लोकांच्या दुर्गुणाची खुशामत करीत नाही किंवा त्यांच्या सद्गुणाविषयी त्यांना नाउमेद करीत नाही. जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेत ‘प्रभाकारी’ (brightness, तेजस्विता) अवस्था प्राप्त करुन घेतो. यावेळी बोधिसत्त्वाची बुद्धी आरशाप्रमाणे स्वच्छ झालेली असते. ‘अनात्म व अनित्यता’ यांच्या सत्याचे त्याला पूर्ण ज्ञान आणि आकलन झालेले असते. आता त्याला फक्त सर्वोच्च ज्ञान मिळविण्याची इच्छा असते आणि त्यासाठी तो कशाचाही त्याग करण्यास तयार असतो. जीवनाच्या चवथ्या अवस्थेत तो ‘अर्चिष्मती’ (अग्नीप्रमाणे तेजस्वी बुद्धिमत्ता, intelligence) प्राप्त करुन घेतो. या स्थितीत बोधिसत्त्व अष्टांगिक मार्ग, चतुर्विध ध्यान, चतुर्विध व्यायाम, चतुर्विध इच्छाशक्ती आणि पंचशील यांच्यावर आपले चित्त क्रेंद्रित करतो. जीवनाच्या पाचव्या अवस्थेत तो “सुदुर्जया” (जिंकण्यास कठीण अशी स्थिती) प्राप्त करुन घेतो. ‘सापेक्ष आणि निरपेक्ष’ यांच्यातील संबंधाचे त्याला पूर्ण ज्ञान होते.  जीवनाच्या सहाव्या अवस्थेत तो ‘अभिमुखी’ होतो. या अवस्थेत ‘पदार्थांची उत्क्रांती आणि तिचे कारण’ याची ‘बारा निदाने’ पूर्ण आकलन करण्याची त्याची तयारी झालेली असते; आणि ‘अभिमुखी’ नावाच्या त्या ज्ञानामुळे, अविद्येने अंध झालेल्या सर्व प्राणीमात्रांविषयी त्याच्या अंतःकरणात अगाध करुणा उत्पन्न होते. जीवनाच्या सातव्या अवस्थेत बोधिसत्त्व ‘दूरङ्गमा’ (दूर जाणे) ही अवस्था प्राप्त करतो. बोधिसत्त्व आता दिक्कालातीत असतो. तो अनन्ताशी एकरुप झालेला असतो. तथापि, सर्व प्राणीमात्रांंविषयी वाटणाऱ्या करुणेमुळे त्याने आपले नाम-रूप अद्यापही धारण केलेले असते. एका बाबतीत मात्र तो इतरांच्यापेक्षा अगदी निराळा असतो. कमलपत्रावर ज्याप्रमाणे पाणी ठरत नाही, त्याप्रमाणे जगातील मोह त्याला चिकटून राहत नाही. तो आपल्या सहचरांतील तृष्णा शांत करतो. परोपकारबुद्धी, सहनशीलता, व्यवहारचातुर्य, शक्ती, शांत वृत्ती, बुद्धी आणि सर्वश्रेष्ठ प्रज्ञा यांची तो जोपासना करतो. या अवस्थेत असताना त्यांना धर्माचे ज्ञान होते; परंतु लोकांना समजेल अशा रीतीनेच ते त्याची त्यांना ओळख करुन देतात. आपण व्यवहारचातुर्याने आणि सहनशीलतेने वागले पाहिजे हे त्यांना कळते. लोकांनी त्यांना कितीही त्रास दिला तरी ते शांत वृत्तीने तो त्रास सहन करतात; कारण केवळ अज्ञानामुळेच लोकांनी त्यांच्या हेतूबद्दल गैरसमज करुन घेतले आहेत हे त्यांना कळलेले असते. परंतु त्याच वेळी प्राणिमात्राचे कल्याण करण्याविषयीचा त्यांचा उत्साह यत्किंचितही कमी होत नाही किंवा प्रज्ञेकडेही (wisdom) ते पाठ फिरवित नाहीत. म्हणून दुर्दैव त्यांना सन्मार्गावरुन कधीही पराजित करु शकत नाही. जीवनाच्या आठव्या अवस्थेत तो “अचल” होेतो. या अढळ अवस्थेत बोधिसत्त्वाला करावे लागणारे सर्व कष्ट संपतात. जे जे चांगले आहे ते ते स्वाभाविकतःच अनुसरत ते जी जी गोष्ट करतील त्या त्या गोष्टीत तथागत यशस्वी होतात. जीवनाच्या नवव्या अवस्थेत तथागत “साधुमती” होतात. ज्याने सर्व धर्म किंवा त्यांची शास्त्रे, व्यवस्था आणि सर्व दिशा जिंकल्या आहेत आणि त्यांचे त्याला पूर्ण आकलन झालेले असून जो कालातीत होेतो अशाची साधुमति ही अवस्था असते. जीवनाच्या दहाव्या अवस्थेत तो “धर्ममेघ” होतो. बोधिसत्त्वाला बुद्धांची अनंत दिव्यदृष्टी प्राप्त होते. बोधिसत्त्व ही दहा सामर्थ्य प्राप्त करुन घेतो; कारण बुद्ध होण्यास त्यांची आवश्यकता असते. बोधिसत्त्वाची स्थित्यंतरे होत असताना त्यांनी ही दहा सामर्थ्य मिळवली पाहिजेत; इतकेच नव्हे तर त्याने “दहा पारमितां” चाही परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे. एक पारमिता ही जीवनाच्या एका अवस्थेची परिपूर्ती असली पाहिजे. पारमितांचा खास व्यासंग पायरीपायरीने केला पाहिजे. एका जीवनावस्थेत एकच पारमिता असली पाहिजे. एकीचा थोडा अंश आणि दुसरीचा थोडा अंश असे मिश्रण असता कामा नये. अशा प्रकारे बोधिसत्त्वाची दुहेरी तयारी झाल्यानंतरच तो ‘बुद्ध’ होतो. बुद्ध हा बोधिसत्त्वाच्या जीवनातील कळस होय. बोधिसत्त्वाच्या या जीवनावस्थांचा किंवा जातकांचा हा सिद्धांत ईश्वराच्या अवतारवादाच्या ब्राह्मणोक्त सिद्धांतासारखा वाटतो. जातकसिद्धांत हा बुद्धांच्या अत्युच्च शुद्धावस्थेच्या जीवनाचे सार यावर आधारलेला आहे. अवतारवादात ईश्वराच्या जीवनाची घडण पवित्र असावी अशी अपेक्षा नाही. अवतारवादी ब्राह्मणोक्त कल्पनेचा अर्थ इतकाच की ईश्वर निरनिराळे अवतार घेऊन आपल्या भक्तांचे रक्षण करतो; मग त्याचे वर्तन अतिशय अशुद्ध आणि अनैतिक असले तरी चालते. बुद्ध होण्यासाठी बोधिसत्त्व आवश्यक अशा दहा जीवनावस्थेतूनच गेले पाहिजे; या सिद्धांताला दुसऱ्या कुठेही तोड नाही. दुसरा कोणताही धर्म आपल्या संस्थापकाला असल्या कसोटीला उतरण्याचे आव्हान देत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *