भगवान बुद्धांचे सारनाथ येथे आगमन

बौद्धमय भारत
आपल्या धम्माचा उपदेश करण्याचे ठरविल्यानंतर बुद्धांनी स्वतःलाच विचारले की, “सर्वप्रथम कुणाला धम्मोपदेश देऊ?” (“to whom shall i first teach the doctrine?”) त्यांना आलारकालाम याची आठवण झाली. बुद्धांच्या मते तो विद्वान, शहाणा, बुद्धिमान व बराच शुद्धाचरणी होता. “त्यालाच मी प्रथम धम्मोपदेश दिला तर?” परंतु आलारकालाम मृत्यू पावल्याचे त्यांना सांगण्यात आले. नंतर त्यांनी उद्दक-रामपुत्ताला आपला धम्मोपदेश देण्याचा विचार केला; परंतु तोही मृत्यू पावला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या जुन्या पाच सोबत्यांचा विचार केला. निरंजना नदीच्या काठी त्यांनी उग्र तपश्चर्या चालविली असताना ते त्यांच्या बरोबर होते. आणि त्यांनी तपश्चर्येचा त्याग केल्यामुळे रागावून ते त्यांना सोडून गेले होते. बुद्ध स्वतःशीच म्हणाले, “त्यांनी माझ्यासाठी पुष्कळच केले. माझी सेवा केली. माझी खूप काळजी घेतली. मग मी त्यांनाच माझ्या धम्माचा उपदेश प्रथम दिला तर काय हरकत आहे?” त्यांनी त्यांच्या ठावठिकाण्याची चौकशी केली, तेव्हा त्यांना समजले की ते सारनाथला इसिपत्तनच्या मृगदायवनात राहात आहेत (in the deer park of Isipatana). ते त्यांच्या शोधार्थ तिकडे निघाले. त्या पाच जणांनी जेव्हा बुद्ध येत असल्याचे पाहिले तेव्हा त्यांचे स्वागत करावयाचे नाही असे त्यांनी ठरविले. त्यांच्यापैकी एकजण म्हणाला, “मित्रांनो, हा श्रमण गौतम येत आहे. तपश्चर्येचा मार्ग सोडून देऊन हा समृद्धीच्या आणि चैनीच्या जीवनाकडे वळला होता. त्याने पाप केले आहे. म्हणून त्याचे स्वागत करायचे नाही. त्याला अभिवादन करायचे नाही. त्याला मान देण्यासाठी उभे राहता कामा नये, किंवा त्याचे भिक्षापात्र आणि चीवर आपण आपल्या हाती घेता कामा नये. आपण त्याच्यासाठी फक्त एक आसन बाजूला ठेवून देऊ. त्याची इच्छा असल्यास तो तेथे बसेल.” सर्वांनी हे मान्य केले. परंतु बुद्ध जेव्हा त्यांच्याजवळ आले तेव्हा ते पाच परिव्राजक आपल्या निश्चयानुसार वागू शकले नाहीत. बुद्धांच्या व्यक्तीमत्वाचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की, ते आपल्या जागेवर उठून उभे राहिले. एकाने त्यांचे पात्र घेतले, एकाने त्यांचे चीवर सांभाळले. एकाने त्यांच्यासाठी आसन तयार केले आणि एकाने त्यांचे पाय धुण्यासाठी पाणी आणले. खरोखर हे एका नको असलेल्या अप्रिय अतिथीचे असाधारण असे स्वागत होते. अशाप्रकारे जे त्यांचा उपहास करणार होते ते त्यांची पूजा करु लागले.
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
*************************
भाग दुसरा- परिव्राजकांची धम्मदीक्षा
The Conversion of Parivrajakas
*************************

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *