रिपब्लिकन पक्षाचा खरा इतिहास भाग – ५

रिपब्लिकन पक्ष
रिपब्लिकन पक्षाची अधिकृत स्थापना दि. ३ ऑक्टोबर १९५७ रोजी झाली असली, तरी त्याला साधारणतः १९२४ सालच्या बहिष्कृत हितकारणी सभेच्या स्थापनेपासूनची परंपरा आहे. या परंपरेच्या पार्श्वभूमीनेच त्याला काही व्यापक आणि महत्वाचे संदर्भ दिलेले आहेत. या पूर्वी सांगितल्या प्रमाणे, बाबासाहेबांना भारतीय समाजाला आधुनिक जगाशी, त्याच्या आधुनिक समाज आणि राजकीय व्यवस्थेशी, त्याच्या आधुनिक जीवनमूल्यांशी संवादी बनवायचे होते. त्यासाठी पोषक असे वैचारिक वास्तव निर्माण करायचे होते. त्या मार्गातील अडथळ्यांना अचूक वेध घ्यावयाचा होता. तास तो त्यांनी प्रदीर्घ अभ्यासातून आणि चिंतनातून घेतला. या मार्गातील अडथळ्यांपैकी जातिसंस्था,राजकीय जाणिवांचा अभाव, धर्माच्या प्रभावातून आलेली अंधश्रद्धा, विस्कळीत आणि कूपमंडूक जनता, सत्तालोलुप भारतीय नेते आणि स्वार्थी ब्रिटिश साम्राज्यशाही हे अडथळे त्यांना प्रमुख वाटत होते. म्हणूनच बाबासाहेबांची लढाई प्रमुख चार पातळ्यांवरून झालेली दिसते.

 

१} पहिल्या पातळीवर जातिसंस्थेचा विचार होता. तिची वैचारिक चिकित्सा करून तिच्या अनंताचा व्यावहारिक कार्यक्रम भारतीयांना देणे या गोष्टीला बाबासाहेबांच्या विचारात प्राथम्य होते. 
२} दुसऱ्या पातळीवर भारतीय अस्पृश्य वर्गाला नागरी अधिकार देण्याचा विचार होता. हे अधिकार राजकीय सत्तेत वाटा मिळाल्याशिवाय आणि विस्कळीत जनता संघटित झाल्याशिवाय त्यांना शक्य दिसत नव्हते. त्यामुळेच बाबासाहेब एकीकडून शिक्षणाच्या प्रसाराचा आग्रह धरीत होते आणि दुसरीकडून दलितांच्या राजकीय सत्तेत सहभागी होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यास सांगत होते. 
३} तिसरी पातळी त्यांच्या समकालीन राजकीय चळवळी आणि त्यांचे नेते त्यांच्याशी ठरवायच्या संबंधाची होती. त्यांच्याशी कधी संवाद साधून तर कधी संघर्ष करून त्यांना आधुनिक राजकीय मूल्यांचा आणि लोक कल्याणकारी राज्याच्या कल्पनेचा स्वीकार करणे भाग पाडायचे होते. 
४} चौथी पातळी ब्रिटिश साम्राज्याशाहीची कसे संबंध असावेत या दृष्टीने करावयाच्या विचाराची होती. ब्रिटिश साम्राज्याशाही भारतीय सामंतशाहीपेक्षा निश्चितच प्रागतिक आणि समंजस होती. भारतासारख्या परंपरानिष्ठ देशात ती काही मूलगामी परिवर्तके करील आणि आधुनिक जीवनमूल्ये रुजवायला पोषक ठरेल असे मानणारा विचारवंतांचा आणि नेत्यांचा एक मोठा वर्ग होता. न्या. महादेव गोविन्द रानडे, राजा राममोहन रॉय, मी.ज्योतिराव फुले हि त्यांपैकी काही महत्वाची नावे आहेत. बाबासाहेबांनी ब्रिटिश साम्राज्याशाहीशी राजकीय डावपेचांच्या आधारे संवाद साधून दलितांच्यासाठी जास्तीत जास्त हक्क पदरात पाडून घेतले. भारतीय दलित चळवळीचा विकास याप्रकारे बाबासाहेबांच्या नेतृत्वा खाली चालू होता. 
भारतीय जातिसंस्थेच्या संबंधी तिच्या जन्मापासून पहिली स्पष्ट आणि शास्त्रीय भूमिका घेण्याचा मान बाबासाहेबांकडे जातो. १९१६ साली त्यांनी युनिव्हर्सिटीत डॉ. गोल्डनविजर यांच्या चर्चासत्रात भारतातील जातीच्या तंत्र, उगम आणि विकासाबद्दल प्रबंध वाचण्याचा उल्लेख या पूर्वीच आला आहे. १९३५ साली जाती संस्थेच्या उच्छेदावर आपली भूमिका स्पष्ट केली. बाबासाहेबांचा एनिहिलेशन ऑफ कास्ट हा दस्तावेज कम्युनिस्ट आणि समाजवादी विचारवंतांच्या नजरेतून निसटला हे त्यांचे दुर्दैव होते.  अॅनिहिलेशन ऑफ कास्ट हा दस्तएवज कम्यु। नजरेतून निसटला हे त्यांचे दुर्दैव होते. त्यांच्या पुढील वाताहतीची संभाव्य कारणे कोणती असतील याचा इशारा देणारी मांडणी त्यात होती. तो त्यांच्या नजरेत फार उशीरा भरला याची स्पष्ट कबुली मधु लिमये यांनी दिलेली आहे. जातीसंस्थेने केवळ अस्पृश्यांच्याच जीवनाचा विध्वंस केला असे नाही, तर तिच्यामुळे संपूर्ण भारतदेशच उध्वस्त झालेला आहे, हा विचार बाबासाहेबांनी इतिहास आणि धर्मशास्त्रांच्या आधारे स्पष्ट करून सांगितला. जाती नष्ट करण्यासाठी आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन आणि जातिसंस्थेचा संस्कार करणाऱ्या धर्मश्रद्धांच्या प्रभावापासून मुक्ती या दोन गोष्टींवर त्यांनी भर दिला. बाबासाहेबांचा हा दस्तावेज जणू आधुनिक भारताच्या निर्मितीचा जाहिरनामाच होता. बाबासाहेबांच्या याच विचारांचे सूत्र त्यांच्या ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथात प्रगल्भपणे विकसित आणि अभिव्यक्त झाले आहे. बाबासाहेबांनी दलितवर्गाच्या संघटनाचे प्रयत्न केले. बहिष्कृत हितकारीणी सभा’ ही या दिशेने सुरुवात आणि ‘रिपब्लिकन पक्ष’ हा अत्युच्च विकास असे हे नाते आहे. या दोहोंच्या दरम्यान बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्षाचा प्रयोग यशस्वी करून दाखविला. बदलत्या राजकीय वास्तवात शेडयूल्ड कास्ट फेडरेशन त्यांना काहीशा अनिच्छेनेच स्थापन करावी लागली. तिच्या दुष्पपरिणामांची चर्चाही १३ ऑक्टो. १९५६ रोजी त्यांनी नागपुरात मनमोकळेपणे केली. दलितांचा प्रश्न हा केवळ दलितांचा नसून तो दलित आणि सवर्ण यांच्या संबंधातून निर्माण झालेला प्रश्न आहे. त्यामुळे दलितांचा प्रश्न सोडविण्यासाठी जसे दलित संघटित होणे आवश्यक आहे तसेच त्यात समविचारी सवर्णही सामील झाले पाहिजेत ही आंबेडकरांची राजकीय संघटनाबाबतची दृष्टी होती. या दृष्टीला त्यांनी प्रत्यक्ष व्यवहारात उतरविले होते. बहिष्कृत हितकारिणी सभा किंवा स्वतंत्र मजूर पक्ष यांच्या प्रमुख नेत्यांची नावे पाहिली तरी हा व्यवहार स्पष्ट होतो. त्यात दोदे, चित्रे, टिपणीस, परुळेकर इत्यादी नावे अग्रभागी होती. रिपब्लिकन पक्षातही डॉ. राम मनोहर लोहिया, एस. एम. जोशी, प्र. के. अत्रे इ. नावे अग्रभागी असावीत असे त्यांना वाटत होते. त्या दिशेने पत्रव्यवहार आणि संवाद सुरूच होता. ‘संसदीय लोकशाहीच्या मार्गाने समाजवादी समाजरचनेची स्थापना करणे’ हे बाबासाहेबांच्या राजकीय विचारांचे सूत्र होते. त्यासाठी प्रौढमताधिकार, अस्पृश्यवर्गाला त्यांच्या संख्येच्या प्रमाणात विधिमंडळात राखीव जागा याबद्दल बाबासाहेब आग्रही होते. १९२८ साली सायमन कमिशनला आपला स्वतंत्र अहवाल सादर करताना त्यांचा हा आग्रह स्पष्ट आणि कामयच राहिला. “भारत हा टोकाचा लोकशाहीविरोधी देश आहे. त्यात लोकशाही यशस्वी व्हावयाची असेल, प्रादेशिक मतदार संघ आणि स्वतंत्र मतदार संघ ही दोन्हीही टोके टाळून येथे राखीव तर जागांसह संयुक्त मतदारसंघच स्थापन करून सुवर्णमध्य साधला पाहिजे’ अशी त्यांची मूळ भूमिका स्पष्ट होती. परंतु या रास्त भूमिकेलाच गांधीजींनी जेव्हा आव्हान दिले त्यावेळी आंबेडकरांनाही राजकीय डावपेच खेळणे भाग पडले. गांधीजी विरोध करत होते म्हणून बाबासाहेब स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीच्या टोकावर गेले. ते त्यांनी मिळवूनही दाखविले. परंतु गांधीजींनी उपोषण धरले आणि संपूर्ण देशात बेचैनी पसरली. शेवटी ‘पुणे कराराने’ बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी सोडून दिली आणि आपल्या राखीव जागांसह संयुक्त मतदारसंघाच्या भूमिकेवर ते स्थिर झाले. तिकडे गांधीजीही दोन पावले मागे आले, त्यांनी राखीव जागा मान्य केल्या. पुणे कराराचा तपशील ही त्या अर्थाने बाबासाहेबांच्या राजकीय विचारसूत्राची विजयी पताका होती. त्यानंतरच्या काळात बाबासाहेबांचा वेळ आणि शक्ती राष्ट्रीय पातळीवरील समस्या सोडविण्यात खर्च झाली. त्यांनी लिहिलेला ‘पाकिस्तान और पार्टिशन ऑफ इंडिया’ हा ग्रंथ म्हणजे भारताच्या भूत, वर्तमान आणि भविष्यासंबंधी केलेला सखोल अभ्यास आहे. ज्यांच्या मनात आजही भारत नीट समजून घ्यायची इच्छा असेल त्यांनी तो अभ्यासलाच पाहिजे.
पुढील भाग लवकरच प्रकाशित करण्यात येईल. 
संदर्भ- रिपब्लिकन पक्ष ऐक्य,वास्तव आणि भवितव्य 
लेखक- डॉ रावसाहेब कसबे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *