त्यामुळे कोणत्याही प्रश्नाकडे बघण्याची, त्याची चिकित्सा करण्याची आंबेडकरांच्या पद्धती वैशिष्ट्यपूर्ण दिसते. त्यांनी १९१९ साली साऊथबरो कमिशनला सादर केलेल्या अहवालापासून ते १९५५ साली भाषावार प्रांतरचनेच्या संबंधी व्यक्त केलेल्या मतापर्यँत व्यवहारिक, तांत्रिक गोष्टीसंबंधी आणि राष्ट्राच्या मूलभूत प्रश्नांसंबंधी जी मते बांधलेली आहेत, त्यांना स्थानिक, राष्ट्रीय आणि जागतिक असा तीन पाटल्या आहेत. त्यामुळे बाबासाहेबांबरोबर वादविवाद करणे सोपे नव्हते. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करणे आणि त्यांचा ज्ञानक्षेत्रातील दरारा मान्य करून स्वतःची सुटका करून घेणे मात्र सोपे होते. त्यामुळेच आंबेडकर नावाचा एक दरारा जीवनाच्या अनेक क्षेत्रांत निर्माण झाला तो आजपर्यंत तरी आपण टाकलेला पाहतो. त्याला जसे समर्थक लाभले तसे विरोधकही लाभले.
बाबासाहेबानी स्वप्रयत्नाने अर्जित केलेली हि विद्वत्त, कर्तृत्व आणि कीर्ती हा सर्व्यांच्याच आदराचा विषय होता. परंतु बाबासाहेब हे नाव हे भारतातील सर्व उपेक्षित जनसमुदायासाठी मात्र एक संरक्षक कवच होते. हे नावच त्यांना जीवनात स्वाभिमानाने उभे राहायला आणि भविष्याची स्वप्ने रंगविण्यासाठी कृपाछत्र वाटत होते. हेच संरक्षक कवच आणि कृपाछत्र बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाच्या हातात दिले आणि ते निघून गेले अशीच या समुदायाची आजही भावना आहे. म्हणूनच त्यांच्या दृष्टीने बाबासाहेब आणि रिपब्लिकन पक्ष यांचे अस्तित्व अभिन्न आहे. त्यांनी मनातल्या मनात त्यांच्यात कधीच अभेद्य निर्माण केलेला होता. रिपब्लिकन पक्ष दीर्घकाळ व्यवहाराचा, राजकीय चिकित्सेचा विषय त्यामुळेच बनू शकला नाही. उपेक्षित जनमानसातील आंदालनांनी त्याला भावनेच्याच पातळीवर ठेवले. हि त्या पक्षाची एक वास्तविक मर्यादा आहे. परंतु, दलित समाजातून अनेक नेते उदय पावले आणि राजकीय दृष्टया गेले, अनेक संस्था आणि संघटना उदय पावल्या आणि अस्तंगत झाल्या, अनेक गट-तट निर्माण झाले; तरीही समाजमनात मात्र बाबासाहेब आणि रिपब्लिकन पक्ष यांच्यात अभेद्य मानलेली प्रतिमा कधी सुप्त तर कधी प्रकट रूपात अढळ राहिली. हे रिपब्लिकन पक्षाचे अनन्यसाधारण असे सामर्थ्य आहे. रिपब्लिकन पक्षाच्या चिवट अस्तित्वाचे हेच रहस्य आहे. हे रहस्य केवळ उत्पादनशक्ती- फोर्सेस ऑफ प्रॉडक्शन आणि उत्पादनसबंध- रिलेशन्स ऑफ प्रॉडक्शन यांची चर्चा करून उलगडवून दाखविता येणे अवघड आहे. त्यासाठी समाजाच्या भौतिक पायाबरोबरच भारतीय हिंदूंच्या सांस्कृतिक परंपरेच्या आणि जातिसंस्थेच्या उगम,विकास आणि प्रभावाच्या गतिशास्त्राचा विचार होणे आवश्यक आहे. धर्मशास्त्रांनी जनमानसावर दीर्घकाळ टाकलेल्या प्रभावाचीही चिकित्सा होणे गरजेचे आहे. थोडक्यात असे म्हणता येईल कि, धर्मचिकित्सा होणे आवश्यक आहे. तिच्या अभावामुळे भारतात वर्गीय चळवळ उभीच करता आली नाही. जिला वर्गीय चळवळ मानले गेले, तिच्यात जातीय जाणीव तशाच प्रबळ राहिल्या. राजकीय लोकशाहीने त्यांना अधिक गती दिली आणि बदलत्या राजकीय वास्तव्यात संधी मिळताच त्यांच्यात स्फोट होऊन त्या फुटल्या. डाव्या आणि पुरोगामी चळवळींनी परिश्रमपूर्वक निर्माण केलेली वर्गीय एकजूट या प्रकारे विघटित होणे आणि कामगार चळवळीत या प्रकारचे धरणीकंप होणे हि तापदायक घटना आहे. तिने सर्वच कष्टकऱ्यांची मुक्ती लांबणीवर टाकली आहे. रिपब्लिकन जनता यांच्यापैकी एक असल्याने या घटनेच्या दुष्पपरिणामापासून ती अलिप्त राहू शकत आहे.
लेखक- डॉ रावसाहेब कसबे