रिपब्लिकन पक्षाचा खरा इतिहास भाग – १

रिपब्लिकन पक्ष

अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष हे बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय जनतेला दिलेलं शेवटचं राजकीय हत्यार आहे. या हत्याराचा प्रभावीपणे उपयोग करून भारतीय समाजाच्या सामाजिक-आर्थिक जीवनात लोकशाहीच्या आणि अहिंसक मार्गाने क्रांतिकारी परिवर्तन केले जाईल असा विश्वास वाटत होता. या राजकीय पक्षाचा बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाशी या प्रकारे अतूट संबंध असल्याने भारतातील प्रत्येक प्रांतात या पक्षाबद्दल ममत्व वाटावे अशी जनता संख्येने कमी असली तरी, तिचे वास्तव्य निश्चित आहे. हे या पक्षाचे सामर्थ्य आहे, परंतु महाराष्ट्र वगळता या पक्षाला अन्यत्र कुठेही राजकीय हस्तक्षेप करण्या इतकी क्षमता असल्याचे दिसत नाही. तो महाराष्ट्राची राजकीय समीकरणे मात्र बदलू शकतो हे त्याच्या निश्चित स्वरूपाच्या आणि चिवट जनाधारणे अनेकदा सिद्ध केले आहे. त्याचप्रमाणे हा पक्ष महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्नातही प्रभावी हस्तक्षेप करू शकतो. दलित पँथरच्या सामाजिक अन्याय विरुद्धच्या प्रतिकारातून, मंडल आयोगाच्या अंबलबजावणीच्या परिषदेतून किंवा रिडल्सच्या प्रश्नावर झालेल्या आंदोलनातून हे निर्विवादपणे सिद्ध झालेले आहे. या पक्षाचे कार्यकर्ते समांतरपणे धार्मिक क्षेत्रात कार्यरत असतात आणि काही साहित्य चळवळीतही लक्ष घालतात. त्यामुळे या पक्षाला राजकीय परिणामाबरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक परिमाणेही लाभलेली आहेत. त्यामुळे हा पक्ष काहींच्या आकर्षणाचा तर काहींच्या चिंतेचा विषय बनणे क्रमप्राप्त आहे.
चिकित्सेऐवजी भावनेचा विषय:-
रिपब्लिकन पक्ष वरून काही चिकित्सक लिहिणे,बोलणे हि एक अवघड गोष्ट आहे कारण रिपब्लिकन पक्ष हा केवळ एक राजकीय पक्ष आहे असे कोणी मनात नाही. तो सामान्य राजकीय पक्षापेक्षा अधिक काहीतरी आहे अशी एक सार्वत्रिक भावना त्याच्या जन्म काळापासूनच प्रचलित आहे. त्यामुळे इतर राजकीय पक्षात ज्या प्रकारच्या अंतर्गत आणि जाहीर चर्चा चालतात, तशा इथे क्वश्चितच होताना आढळतात. पक्षाच्या अस्तित्वाची सुरक्षितता, त्याचा जनधाराच्या वाढीला पोषक ठरतील असे राजकीय डावपेच, राष्ट्रीय आणि स्थानिक प्रश्नावर त्याने घ्यावयाच्या भूमिका इ. गोष्टींची आवश्यक चर्चा इथे पूर्णपणे वर्ज्य नसली तरी दीर्घकाळ उपेक्षित राहिलेली दिसते.
सर्वसाधारणपणे राजकीय नेते मंडळीत तत्वज्ञान किंवा मुक्त चर्चा हा एक टिंगलीचा विषय असतो. त्याचे साधे कारण असे कि, चर्चेतून प्रश्न होतात आणि प्रश्नांना  व्यवहाराच्या आधारे उत्तरे द्यावी  त्यासाठी नेते मंडळींकडे राजकीय विचारांची पक्की बैठक आणि वास्तवाचे चिकित्सक ज्ञान असावे लागते. राजकीय नेत्यांचा दिनक्रम  पाहिला तर यासाठी त्यांच्याकडे वाचन आणि चिंतनासाठी वेळ असणे आवश्यकच असते. फार थोडे नेते असा वेळ जाणीव पूर्वक काढत असतात. रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वात अशा ‘थोड्या नेत्यांचा’ सुरुवातीचा काही काळ सोडल्यास उरलेल्या दीर्घ काळात प्रचंड दुष्काळच आहे. याची कारणे जशी त्यांच्या व्यक्तिगत जीवनातीळ मर्यादात  शकतात तशीच ती रिपब्लिकन पक्षाबद्दलच्या जनतेच्या मनातील अढळ प्रतिमेतही सापडतात. इतर सर्वच राजकीय पक्षांना केंद्रीय सत्तेची स्वप्ने पडत असतात. त्यासाठी जनाधार वाढविणे हे त्यांचे उद्धिष्ट असते. कार्यकर्त्यांचे संगठन, त्यांचे प्रशिक्षण, त्यांच्या कार्यावर देख रेख, त्यांनी केलेल्या कार्याचे फलित , कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीचे निवारण इ. गोष्टी या राजकीय पक्षांच्या नित्याच्याच बाबी असतात. त्यांना आपल्या पक्षाची सुरक्षितता, त्याच्या जवाबदाऱ्या, त्याच्या जनाधाराबद्दलची चिंता सतत सतावीत असते. त्यामुळे ते सतत उपक्रमशील,गतिमान आणि चौकस असतात. रिपब्लिकन पक्षाचे नेते इतके भाग्यवान आहेत कि त्यांना पक्षाच्या सुरक्षितीचे अजिबात चिंता नाही. उद्दिष्टच मर्यादित असल्याने जनाधार वाढविण्यासाठी खास प्रयत्नांची गरज वाटत नाही. त्यांचा निश्चित स्वरूपाचा जनाधार आणि बाबासाहेब आंबेडकरांचे नाव या दोन गोष्टींमुळे इतर राजकीय पक्षनेतृत्वाला जनाधार टिकवण्यासाठी किंवा त्यात वृद्धी करण्यासाठी जे बौद्धिक मानसिक आणि शारीरिक कष्ट करावे लागतात ते रिपब्लिकन नेत्यांच्या वाट्याला येत नाही. याचा अर्थ ते निष्क्रिय आहेत असा नाही. किंबहुना ते इतरांपेक्षा नेहमीच अधिक गर्दीत असतात. त्यांना अनेक कामाचीही घाईही असते. परंतु ती घाई-गर्दी रिपब्लिकन पक्षासाठी नसते. रिपब्लिकन नेत्यांच्या वर उल्लेखिलेल्या भाग्याचे कारण या ठिकाणी सुरुवातीसच नोंदवून ठेवले पाहिजे. ते असे असे कि, रिपब्लिकन पक्षाचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाशी नाते जितके अतूट आहे तितकाच त्याचा जनधारही अतूट असणार हे समीकरण मान्य झालेले आहे. रिपब्लिकन पक्षाला त्याच्या पूर्वाश्रमीचा अस्पृश्य आणि आताचा नवबौध्द जनाधार केवळ एक राजकीय पक्ष मानीत नाही. तो जनाधार रिपब्लिकन पक्षाच्या अस्तित्वात स्वतःचे जीवन अस्तित्व पाहत असतो. त्याच्या सुरक्षितेला जीवनाचा अर्थ मानतो, त्याच्या सुरक्षेसाठी आणि एक्येसाठी तो कितीही किंमत मोजायला तयार असतो. या साऱ्या गोष्टी त्यांच्या जीवनाचे प्रयोजन आहेत असे मानणाऱ्यांची संख्या या पक्षात लक्षणीय आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्ष हा भावनिकतेचा विषय बनला आहे. आणि तो भावनेचा विषय बनल्या मुळेच त्याच्या ऐक्यासाठी जेवढे प्रयन्त होताना दिसतात तेवढेच त्याच्या विकासासाठी, वाढीसाठी झालेले दिसत नाहीत. रिपब्लिकन पक्ष हा जनमानसाच्या भावनेचा विषय बनल्याने आणि ती भावना जाणीवपूर्वक वृद्धिंगत केली गेल्याने त्याची वस्तुनिष्ठ चिकित्सा होऊ शकली नाही. त्यांच्यासंबंधी काही बरे-वाईट बोलणे हि जोखीम मानली गेली. त्यामुळे तो समीक्षेपासून दूरच राहिला. त्यात पक्षा अंतर्गत आणि जाहीरपणे जे वादविवाद, जी चर्चा आणि जी आत्मटीका होणे आवश्यक होते ती कधी झालीच नाही. झाली ती फक्त भांडणे, एकमेकांची उणी-दुणी आणि एकमेकांना शिव्याशाप, ज्या राजकीय पक्षाला त्याच्या कार्यकर्त्यांकडून,जनतेकडून, राजकीय समीक्षांकडून होणाऱ्या समीक्षेतून जावे लागत नाही असे राजकीय पक्ष कुंठित होतात. रिपब्लिकन पक्षाच्या कुंठितवावस्थेचे ते एक प्रमुख कारण आहे. विधायक टीका, पूर्वग्रहरहित समीक्षा आणि व्यापक दृष्टीकोनातून झालेली चिकित्सा हि राजकीय पक्षाच्या वाढीसाठी नेहमीच उपयुक्त असते. अशा प्रकारच्या चर्चेचे स्वागत रिपब्लिकन पक्षाची सामान्य जनता, ध्येयनिष्ठ कार्यकर्ते आणि विवेकी नेते करतील अशी आशा आहे.

 
संदर्भ- रिपब्लिकन पक्ष ऐक्य,वास्तव आणि भवितव्य 
लेखक- डॉ रावसाहेब कसबे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *